सावदा ते हतनूर रस्त्यावरील खड्ड्यांत दिवाळीचे दिवे लावण्याचा नागरिकांचा संकल्प!
खड्ड्यांत दिवाळीचे दिवे लावण्याचा नागरिकांचा संकल्प!
लेवाजगत न्यूज (सावदा प्रतिनिधी):- सावदा ते सावदा रेल्वे स्टेशन, गाते, उदळी, हातनूर आणि जुनी कॉलनीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना प्रचंड गैरसोय होत आहे. दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी आणि या खड्ड्यांमुळे होणारे अपघात — या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे.
लहान वाघोदा, गाते, उदळी या गावातील नागरिकांनी एकत्र येऊन ठरवले आहे की, दिवाळीपूर्वी जर रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाहीत, तर ते आपल्या घरातील दिवे रस्त्यातील खड्ड्यांत लावून “दिवे आंदोलन” करणार आहेत.
या आंदोलनाद्वारे नागरिक प्रशासनाला संदेश देणार आहेत की, सण साजरा करण्यापेक्षा सुरक्षित रस्ते मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सावदा उपविभागाला तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
तसेच सावदा रेल्वे स्टेशन परिसरातील केळी वेफर विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि त्यामुळे निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. रेल्वे स्टेशन ते गेटपर्यंतचा रस्ता रुंदीकरण करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर खड्डे न भरले, तर दिवाळीचे दिवे घरात नव्हे तर खड्ड्यांत पेटवले जातील.”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत