Contact Banner

भुसावळ येथील २५.४२ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा; ड्रायव्हरच ठरला सूत्रधार ! २३.४२ लाख रुपये जप्त; सहा आरोपी अटकेत

 

bhusawal-25-lakh-loot-solved-in-48-hours-driver-mastermind


भुसावळ येथील २५.४२ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा; ड्रायव्हरच ठरला सूत्रधार!


२३.४२ लाख रुपये जप्त; सहा आरोपी अटकेत


लेवा जगत न्यूज भुसावळ | प्रतिनिधी फिरोज खान :-भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तब्बल पंचवीस लाख ब्याळचाळीस हजार रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा (गु.नं. २०७/२०२५) अवघ्या ४८ तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणात तब्बल सहा आरोपींना अटक करून तेवीस लाख ब्याळचाळीस हजार रुपये आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, फिर्यादीच्या कंपनीत कार्यरत असलेलाच ड्रायव्हर या लुटीचा ‘मुख्य सूत्रधार’ ठरला आहे.

Sadguru


घटनेचा तपशील :


दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी मोहम्मद यासीन इस्माईल हे ‘रॉयल कंपनी’त काम करत असून, कार्यालयातील पंचवीस लाख ब्याळचाळीस हजार रुपयांची रोकड रक्कम एका बॅगेत ठेवून मोटारसायकल (एमएच-१९ बीसी ५५८६) वरून घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला धक्का देत फिर्यादीचा तोल गेला आणि आरोपींनी पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला.


या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


तपास आणि उकल :


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. तपासादरम्यान फिर्यादीच्या कंपनीतील ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. चौकशीत त्यानेच गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली.


शाहीद बेग हा पैशांच्या ने-आण वेळेबाबत नियमित माहिती ठेवत असल्याने त्याने अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे मोठी रक्कम असल्याची ‘टिप’ आपल्या साथीदारांना दिली. या साथीदारांमध्ये मुजाहिद आसीफ मलीक, मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम यांचा समावेश होता. पुढे या तिघांनी रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग या परिचितांना या कटात सामील करून घेतले.


घटनेच्या रात्री, अजहर मलक, अमीर खान आणि ईजहार बेग यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून फिर्यादीला धक्का देत पैशांची बॅग हिसकावून घेतली आणि तेथून पलायन केले.


तपासात हे स्पष्ट झाले की सर्व आरोपींनी संगनमत करून पूर्वनियोजित कट रचत दरोडा घातला असून, त्यामुळे या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ३१०(२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.


अटक आणि पार्श्वभूमी :पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी सर्व आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी काहीजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुख्य सूत्रधार शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी व मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे नोंद आहेत, तर अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.


पुढील तपास :आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून, उर्वरित दोन लाख रुपयांची रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्याचे काम सुरू आहे. सर्व आरोपींना मा. न्यायालयाने ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


तपास पथकाची कामगिरी :ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्था.गु.शा. जळगाव), पोलीस निरीक्षक राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ), व पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका) यांच्या देखरेखीखाली पार पडली.


या पथकात उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे (स्था.गु.शा. जळगाव), तसेच श्रीमती पुजा अंधारे, संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, जितू ठाकरे (भुसावळ तालुका), योगेश माळी, भुषण चौधरी, अमर अढाळे, प्रशांत सोनार (भुसावळ बाजारपेठ), आणि प्रमोद पाटील (रावेर पोलीस ठाणे) या अंमलदारांचा सक्रिय सहभाग होता.


या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे भुसावळ तालुका पोलिसांनी नागरिकांचा विश्वास पुन्हा दृढ केला असून, पोलिसांच्या दक्ष तपास कौशल्याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.