जळगाव जिल्ह्यात धोका, भारत सरकार व ISRO तर्फे हैदराबादहून उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता
जळगाव जिल्ह्यात धोका,
भारत सरकार व ISRO तर्फे हैदराबादहून उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता
लेवाजगत न्यूज | जळगाव, दिनांक 28 ऑक्टोबर :
भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैदराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून पार पडतील.
ही वैज्ञानिक बलून उड्डाणे १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने केली जात असून, यंदाही त्याच परंपरेत प्रयोग होणार आहेत. हायड्रोजन वायूने भरलेल्या या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असतो. ती ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि प्रयोग पूर्ण झाल्यानंतर रंगीत पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरतात.
वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे हैदराबादपासून २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडू शकतात. त्यामुळे औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत उपकरणे पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांना विनंती करण्यात येते की, जर अशी उपकरणे किंवा पॅराशूट आढळले तर ती उघडू किंवा हलवू नयेत, कारण त्यांच्यात उच्च विद्युत दाब (हाय व्होल्टेज) असू शकतो आणि छेडछाड केल्यास मौलिक वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकते.
अशा वस्तू आढळल्यास नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, अथवा खालील पत्त्यावर कळवावे —
संचालक, बलून सुविधा केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैदराबाद.
उपकरणांची सुरक्षित परतफेड करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस व खर्चाची परतफेड केली जाईल. मात्र उपकरणांशी छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने ही माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवून स्थानिक भाषेत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होणार असून, सर्व आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्यात येत असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, हैदराबाद यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत