पुण्यात नवले ब्रीजवर भीषण अपघात — 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
पुण्यात नवले ब्रीजवर भीषण अपघात 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
लेवाजगत न्युज पुणे:- राज्यातील वेगाने वाढणाऱ्या पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शहरातील नवले पुलावर (Navale Bridge) हा अपघात झाला असून दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले असून पोलिस व अग्निशमन
दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सर्व जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कसा झाला अपघात?
प्राथमिक माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्याकडे मुंबईच्या दिशेने जात होता. नवले ब्रीजवरील सेल्फी पॉईंट जवळ ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने समोरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली.
या धडकेत एक कार ट्रक आणि कंटेनरच्या मध्ये अडकून जळून खाक झाली. कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
धडकेनंतर आग वेगाने पसरली आणि दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. अपघात इतका भीषण होता की काही वाहनांचा चुराडा झाला. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
पोलीस व अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू
पोलिसांनी नवले ब्रीजवरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. सध्या बचावकार्य सुरू असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नागरिक आणि नेत्यांची प्रतिक्रिया
माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी संताप व्यक्त करताना म्हटले,
“या पुलावर फक्त कॅमेरे लावून उपयोग नाही. वाहतूक नियोजन, स्पीड नियंत्रण आणि सुरक्षा यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने अपघात वारंवार होतात.”
तर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत