Contact Banner

राज्यातील २८९ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! ५ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

 

rajyatil-289-nagarapalika-nivadnuka-acharsanhita-5-novemberpasun

राज्यातील २८९ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार!


५ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता


लेवाजगत न्यूज मुंबई प्रतिनिधी:- राज्यातील नगरपालिकांच्या प्रभागांचे तसेच नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. मतदार यादीदेखील अंतिम करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील २८९ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे निश्चित झाले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी नियोजित असून, त्याच दिवशी निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.



rajyatil-289-nagarapalika-nivadnuka-acharsanhita-5-novemberpasun


राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिकांच्या निवडणुका होणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची सर्व तयारी पूर्ण झाली असून, महापालिकांच्या प्रभागांचे आणि महापौरांच्या आरक्षणाचेही जाहीरनामे या महिन्यात प्रसिद्ध होणार आहेत.


राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, ५ नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, त्यानंतर तीन टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २८९ नगरपालिकांचा २१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असेल. दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुका ३० ते ३५ दिवस चालतील, तर तिसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका २५ ते ३० दिवसांच्या कालावधीत होणार आहेत.


सर्व निवडणुका मिळून साधारणपणे ८५ दिवसांचा कालावधी निवडणूक आयोगाला मिळणार आहे. त्यामुळे सलग तीन महिन्यांपर्यंत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे. सुट्ट्या आणि उत्सवांच्या कालावध्या लक्षात घेतल्यास प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.


या सर्व निवडणुकांमध्ये राज्यातील सुमारे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका राज्याच्या राजकीय रंगमंचावर मोठी चुरस निर्माण करणार असून सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीची तयारी जोरात सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.