Contact Banner

डोंबिवलीत भाजपचा आत्मविश्वास; दोन प्रभागांत बिनविरोध निवड; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

dombivlit-bjpcha-atmavishwas-don-prabhagat-binvirodh-nivad-mukhyamantryankadun-abhinandan


डोंबिवलीत भाजपचे विजयी खाते! दोन महिला उमेदवार बिनविरोध; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

डोंबिवली लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक १८ आणि प्रभाग क्रमांक २६ (क) मधून एकही विरोधी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक १८ (कचोरे विभाग) मधून रेखा चौधरी, तर प्रभाग क्रमांक २६ (क) मधून आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झाली.

ही माहिती समजताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या पलावा येथील निवासस्थानी कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले. यावेळी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि पूर्व मंडळ भाजप अध्यक्ष मितेश पेणकर तातडीने उपस्थित राहिले. बिनविरोध निवडून आलेल्या रेखा चौधरी व आसावरी नवरे यांचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रेखा चौधरी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, मागील दहा ते पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी कचोरे व परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा व विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. विकासकामांची हीच पावती म्हणजे त्यांची बिनविरोध निवड असल्याचे त्यांनी नमूद केले.

रेखा चौधरी या पॅनल क्रमांक १८ अंतर्गत कचोरे, नेतिवली टेकडी, गावदेवी नेतिवली, मेट्रो मॉल परिसर, शास्त्रीनगर व तिसगाव भागातील उमेदवार आहेत. त्या मागील पंधरा वर्षांपासून पालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत.

प्रभाग क्रमांक २६ (क) मधून निवडून आलेल्या आसावरी केदार नवरे या प्रथमच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून येत आहेत. त्यांच्या विरोधातही एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्या पॅनल क्रमांक २६ अंतर्गत म्हात्रेनगर, राजाजी पथ, रामनगर, शिव मार्केट व सावरकर रोड परिसरातील उमेदवार आहेत. या प्रभागासाठी काही माजी नगरसेविकांनी जोरदार प्रयत्न केले होते; मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवीन चेहऱ्याला संधी देत विश्वास व्यक्त केला.

विशेष म्हणजे सावरकर रोड प्रभागातूनच रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि याच प्रभागातून ते पूर्वी नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.


मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद

बिनविरोध निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन्ही महिला उमेदवारांचा थेट संवाद यांच्याशी घडवून आणला. मोबाईलवरील दृश्य-ध्वनी चित्रफितीद्वारे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून कल्याण-डोंबिवली पालिकेत भाजपने दोन महिला उमेदवारांच्या माध्यमातून विजयाचे खाते उघडल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी रेखा चौधरी या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या असून त्या यांच्याशी संबंधित असल्याचे, तसेच आसावरी नवरे यांचे कुटुंब परिवाराशी जोडलेले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही महिला उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. “विजय हा विजय असतो,” असे सांगत नव्या जोमाने जनतेसाठी काम करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.