१५ मिनिटांचा विलंब ठरला महागात मुंबई महापालिका वॉर्ड २१२ मध्ये भाजप उमेदवार अर्जापासून वंचित; निवडणुकीपूर्वीच पक्षाला मोठा फटका
१५ मिनिटांचा विलंब ठरला महागात
मुंबई महापालिका वॉर्ड २१२ मध्ये भाजप उमेदवार अर्जापासून वंचित; निवडणुकीपूर्वीच पक्षाला मोठा फटका
मुंबई लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :
मुंबई महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पार्टीला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये भाजपकडे अधिकृत उमेदवारच नसल्याची विचित्र व दुर्दैवी घटना घडली आहे. हातात भाजपचे अधिकृत तिकीट आणि एबी फॉर्म असूनही अवघ्या १५ मिनिटांच्या विलंबामुळे उमेदवारी अर्ज दाखल न होऊ शकल्याने ही नामुष्की ओढवली आहे.
भाजपने या वॉर्डसाठी मंदाकिनी खामकर यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. पक्षाने आवश्यक तो एबी फॉर्म वेळेत दिला होता. मात्र निवडणूक अर्जासोबत अनिवार्य असलेल्या नवीन बँक खात्याच्या प्रक्रियेसाठी त्या बँकेत गेल्या होत्या. बँकेतील तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेतील विलंबामुळे अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला.
बँकेचे काम आटोपून मंदाकिनी खामकर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्या, तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपली होती. राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र त्या सुमारे १५ मिनिटे उशिरा पोहोचल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
“अर्ज भरण्याची वेळ संपली असून खिडकी बंद झाली आहे,” असे स्पष्ट शब्दांत अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपसारख्या बलाढ्य पक्षाचे अधिकृत तिकीट असूनही वेळेचे काटेकोर पालन न झाल्याने मंदाकिनी खामकर यांना निवडणुकीच्या रिंगणाबाहेर जावे लागले.
या घटनेमुळे वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये सध्या भारतीय जनता पार्टी चा एकही अधिकृत उमेदवार राहिलेला नाही. त्यामुळे आता या वॉर्डमध्ये पक्षाने कोणाला पाठिंबा द्यावा, की तटस्थ भूमिका घ्यावी, असा पेच भाजप नेतृत्वापुढे निर्माण झाला आहे.
ही घटना केवळ राजकीय चूक नसून, “वेळ फार मौल्यवान असते आणि ती कुणासाठीही थांबत नाही,” हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत भाजपला हा धक्का किती महागात पडतो, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत