Contact Banner

फैजपूर नगरपरिषदेकडून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करावी – ‘एनमुक्टो’चे निवेदन

faijpur-nivadnuk-karamchari-mandhan-tfawat-dur-enmukto-nivedan




फैजपूर नगरपरिषदेकडून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करावी – ‘एनमुक्टो’चे निवेदन

लेवाजगत न्यूज फैजपूर, जळगाव — दि. 3 डिसेंबर 2025
नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई यांच्या मानधनात इतर नगरपालिकांच्या तुलनेत तब्बल एक हजार रुपयांची तफावत असल्याचे उघड झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या अन्यायकारक मानधनाविरोधात न्याय मिळावा यासाठी एनमुक्टो प्राध्यापक संघटनेतर्फे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.

नुकत्याच 2 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत फैजपूर नगरपालिका प्रशासनाने केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई यांना अपेक्षेपेक्षा कमी मानधन निश्चित केले. राज्यातील इतर अनेक नगरपालिकांमध्ये आणि अगदी शेजारील यावल नगरपालिकेत केंद्राध्यक्ष ₹3000, मतदान अधिकारी ₹2600 आणि शिपाई ₹1700 असे मानधन देण्यात आले आहे. मात्र फैजपूर येथे प्रत्त्येकी ₹1000 कमी देण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

एकाच जिल्ह्यात, एकाच तालुक्यात आणि एकाच प्रकारच्या निवडणूक कार्यासाठी मानधनात एवढी मोठी तफावत का? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला असून, यामुळे निवडणूक ड्युटीतील कर्मचारी असंतोष व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर एनमुक्टो संघटनेतर्फे उर्वरित रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदनावर डॉ. विजय सोनजे, डॉ. ताराचंद सावसाकडे, डॉ. रवी केसूर, डॉ. मच्छिंद्र पाटील, डॉ. सतीश पाटील, डॉ. जगदीश खरात, डॉ. योगेश तायडे, प्रा. आय. जी. गायकवाड यांची स्वाक्षरी असून, हे निवेदन मुख्याधिकारी श्री. अविनाश गांगोडे यांना देण्यात आले.

निवेदन स्वीकारताना श्री. गांगोडे यांनी सांगितले की,

“संबंधित विषयावर निवडणूक अधिकारी व कार्यालयीन स्तरावर तातडीने चर्चा करून आठ दिवसांच्या आत सकारात्मक आणि योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कर्मचाऱ्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.”

यामुळे निवडणूक ड्युटीतील कर्मचारी वर्गात निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.