Contact Banner

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; नालगोंडातील पवन कुमार रेड्डीवर काळाचा घाला


अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; नालगोंडातील पवन कुमार रेड्डीवर काळाचा घाला

जेवणानंतर अचानक तब्येत बिघडली; शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

लेवाजगत न्युज हैदराबाद :-

तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील मेल्लाडुप्पल्ली गावातील रहिवासी पवन कुमार रेड्डी याचा अमेरिकेत अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पवन अमेरिकेत एम.एस. (उच्च शिक्षण) घेत होता. मित्रांसोबत रात्रीचे जेवण झाल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. मित्रांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेने पवनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावासह संपूर्ण नालगोंडा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

मृत्यूच्या कारणाबाबत संभ्रम; तपास सुरू

अमेरिकेतील स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, सोशल मीडियावर पवनचा मृत्यू अन्नातून विषबाधेमुळे झाल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, अमेरिकेतील पोलिस किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार पवनला अचानक हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे; तथापि याला वैद्यकीय दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

स्वप्न अधुरी राहिली

पवन एम.एस. पदवीसाठी अमेरिकेत गेला होता. शिक्षणासोबतच तो पार्ट-टाइम कामही करत होता. परदेशात शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा पवन अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीय, नातेवाईक तसेच तेलुगू विद्यार्थी संघटनांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पार्थिव भारतात आणण्याचे प्रयत्न

पवनचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, कुटुंबीय भारतीय दूतावासाशी संपर्कात आहेत. आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. या प्रकरणातील अधिक माहिती काही दिवसांत समोर येईल, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.