Contact Banner

जनार्दन हरीजी महाराजांनी साकार केले गुरूंचे स्वप्न - युगप्रवर्तक ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त फैजपूरात भव्य श्रद्धांजली सोहळा

 

janardan-hariji-maharajani-sakar-kela-gurunchya-swapn-fajpur-satpanth-punyatithi


जनार्दन हरीजी महाराजांनी साकार केले गुरूंचे स्वप्न -

युगप्रवर्तक ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त फैजपूरात भव्य श्रद्धांजली सोहळा


लेवाजगत न्यूज फैजपूर प्रतिनिधी-फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे ११ वे गादीपती ब्रह्मलीन पूज्य संत जगन्नाथ महाराज यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय संत समितीच्या संत-महात्म्यांसह विविध धर्म-पंथांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज हे युगप्रवर्तक संत होते. त्यांनी आयुष्यभर समाजजागृती, अध्यात्म व सेवाभावाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत गादीपती परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज गुरूंचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करीत असल्याचे गौरवोद्गार उपस्थित संतांनी काढले.


सतपंथ रत्न महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अखिल भारतीय सर्वपंथीय संत, पंचक्रोशीतील सतपंथ साधक व भाविकांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला.


कार्यक्रमानिमित्त शनिवारी मंदिरात भव्य पूजन करण्यात आले. रविवारी सकाळी ७ वाजता मंदिर परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. फैजपूर शहरातून मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा सकाळी ९.३० वाजता संत जगन्नाथ महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचली. त्यानंतर सर्व संतांनी समाधीचे विधिवत पूजन केले. पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.


सतपंथ देवस्थानच्या वतीने उपस्थित सर्व संतांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी गुरुवर्य जगन्नाथ महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. आज सुरू असलेले सर्व धार्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्य हे गुरूंचे स्वप्न असून, ते आपल्या हातून पूर्ण होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.


पुण्यतिथीचे औचित्य साधून सतपंथ मंदिर संस्थानच्या संतपरंपरेतील ब्रह्मलीन धर्मा महाराजांपासून ते भावी महंत एकदंत महाराज यांच्यापर्यंत पाच पिढ्यांची अखंड सेवा करणाऱ्या सुमनबाई प्रेमचंद सोनवणे यांचा त्यांच्या परिवारासह सत्कार करण्यात आला. या वेळी सुमनबाई भावूक झाल्या होत्या.


श्रद्धांजली अर्पण करताना महामंडलेश्वर राधे राधे बाबा यांनी गुरू जगन्नाथ महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज हे गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर निष्ठेने वाटचाल करीत असल्याचे सांगितले. हीच गुरुप्रती खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.


या वेळी मानेकर बाबा, संत समितीचे कार्याध्यक्ष स्वामी अनिल आनंदजी महाराज, महंत हनुमानदासजी महाराज (भोपाळ), महंत स्वरूपानंदजी महाराज (डोंगरदे), स्वामी लक्ष्मणदासजी महाराज (रावेर), महामंडलेश्वर अरुणदासजी महाराज (हरिद्वार), महंत रामचंद्रदासजी महाराज, महंत जगदीशदासजी महाराज, ह.भ.प. रविंद्र महाराज महाले (नायगाव), ह.भ.प. भरत महाराज, ह.भ.प. धनराज महाराज, ह.भ.प. दुर्गादास महाराज, प्रजापिता ब्रह्मकुमारी शकुंतला दिदी, स्वयंप्रकाशदासजी महाराज (सावदा), श्यामचैतन्यजी महाराज (जामनेर), गेंदालालजी महाराज (भुसावळ), श्रीकांत रत्नपारखी (जळगाव), नरेंद्र नारखेडे, आचार्य डॉ. सचिन पाटील आदी मान्यवरांनी शब्दपुष्पांजली अर्पण केली.


या सोहळ्यास पंचक्रोशीतील भक्तांसह महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथील सतपंथमुखी परिवारातील हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.