Contact Banner

मुंबई व नागपूरमधील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी; राज्यभर खळबळ

 

mumbai-nagpur-courts-bomb-threat-email-high-alert-18-december-2025


मुंबई व नागपूरमधील न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी; राज्यभर खळबळ


ई-मेलद्वारे धमकी, मुंबई उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला व अंधेरी न्यायालये रिकामी; नागपूर जिल्हा न्यायालयातही सुरक्षा वाढवली


लेवाजगत न्यूज मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील मुंबई उच्च न्यायालय तसेच वांद्रे, किल्ला आणि अंधेरी येथील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज गुरुवार, १८ डिसेंबर रोजी देण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी एका ई-मेलद्वारे देण्यात आल्याचे समोर आले असून, यामुळे पोलिस व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.


धमकीचा ई-मेल, तातडीने न्यायालये रिकामी


मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये “मुंबईतील सर्व न्यायालये बॉम्बने उडवून देऊ,” असा गंभीर मजकूर होता. यात विशेषतः वांद्रे आणि किल्ला न्यायालयांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते.


धमकीची तीव्रता लक्षात घेता दुपारी एकच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाची इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. तसेच वांद्रे न्यायालयातील कामकाज स्थगित करून वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अंधेरी न्यायालयातही बॉम्ब असल्याची निनावी धमकी मिळाल्याने संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला.


न्यायालय परिसर सील, बॉम्बशोधक पथकांकडून तपास


सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसरांना पोलिसांनी वेढा घातला असून, कोणालाही आत-बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS) कडून कसून तपासणी सुरू असून, सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


नागपूर जिल्हा न्यायालयालाही धमकी


मुंबईप्रमाणेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही सकाळी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी सांगितले की, सिव्हिल लाईन्स परिसरातील न्यायालयात दोन आरडीएक्स (RDX) आधारित स्फोटके पेरल्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आला होता. यानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवून संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली. सुदैवाने अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.


सायबर पोलिसांकडून तपास सुरू


ही धमकी नेमकी कोणी दिली, त्यामागचा उद्देश काय, याचा शोध घेण्यासाठी मुंबई आणि नागपूर सायबर पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. धमकीच्या ई-मेलचा आयपी ॲड्रेस ट्रॅक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, संबंधित व्यक्तीपर्यंत लवकरच पोहोचण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान, प्रशासनाने नागरिक, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी यांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.