१ डिसेंबरला रात्री १० वाजता प्रचाराची समाप्ती – मतदानाच्या दिवशी जाहिरातींना बंदी
१ डिसेंबरला रात्री १० वाजता प्रचाराची समाप्ती – मतदानाच्या दिवशी जाहिरातींना बंदी
लेवाजगत न्यूज मुंबई, दि. ३० नोव्हेंबर (प्रतिनिधी)
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता संपणार असून त्यानंतर कोणत्याही माध्यमांतून प्रचार करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार मतदानाच्या दिवशी म्हणजेच २ डिसेंबर २०२५ रोजी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच समाजमाध्यमांवर प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करण्यास सक्त मनाई आहे.
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर रात्री १० नंतर प्रचारसभा, रॅली, ध्वनिक्षेपक वापर, प्रचारफेऱ्या वा इतर कोणत्याही प्रकारचा जाहीर प्रचार करता येणार नाही.
राज्य निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या ‘प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश २०२५’ मधील भाग आठच्या परिच्छेद १६ नुसार मतदानाच्या दिवशी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडिया या सर्व माध्यमांत प्रचाराच्या जाहिरातींवर संपूर्ण बंदी लागू राहील, असेही प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.
मतदानाच्या पारदर्शकता आणि शांततेसाठी ही नियमावली अत्यंत महत्त्वाची असल्याचे आयोगाने सांगितले असून सर्व राजकीय पक्ष, उमेदवार तसेच माध्यमांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत