उच्चभ्रू सोसायटीत भीषण दुर्लक्ष! पार्किंगमध्ये झाडू मारणाऱ्या महिलेचा भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
उच्चभ्रू सोसायटीत भीषण दुर्लक्ष! पार्किंगमध्ये झाडू मारणाऱ्या महिलेचा भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
पिंपरी चिंचवड — शहरातील डुडूळगाव परिसरातील यशदा स्प्लेंडर पार्क या उच्चभ्रू सोसायटीत झाडलोट करणाऱ्या एका महिलेचा भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. मृत महिलेचे नाव आशाबाई ढोणे (४६) असे आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ आज सोशल मीडियावर समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशाबाई नेहमीप्रमाणे सोसायटीच्या पार्किंग परिसरात झाडलोट करत होत्या. त्या झाडू मारत-मारत भूमिगत पाण्याच्या टाकीजवळ पोहोचल्या. या टाकीचे झाकण उघडे होते, परंतु त्यांची नजर त्यावर गेली नाही. झाडू मारत पुढे जात असतानाच त्यांचा पाय थेट टाकीत गेला आणि त्या कोसळल्या.
पाण्याची टाकी पूर्ण भरलेली असल्याने त्या काही क्षणांतच बुडाल्या. पडताना त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या, मात्र परिसरात कोणीही जवळ नसल्याने त्यांचे आवाज कोणालाच ऐकू आला नाही.
काही वेळाने नियमित पाहणी करत असलेला सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पोहोचला. टाकीत पडलेल्या आशाबाई दिसताच त्याने तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावून आले आणि बचावकार्य सुरू केले. परंतु तोपर्यंत आशाबाईंचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या अचानक घटनेमुळे ढोणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे.
सुरक्षेतील गंभीर त्रुटी
या घटनेनंतर अनेक सोसायट्यांमध्ये सुरक्षेची गंभीर समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भूमिगत पाण्याच्या टाक्यांना झाकण असणे अनिवार्य असून ते नीट बंद ठेवणे अत्यावश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी झाकण नीट बंद न ठेवण्याची निष्काळजीपणा गंभीर अपघातांना आमंत्रण देत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत