Contact Banner

सावदा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन

 

ramanandacharya-narendraacharyaji-siddh-paduka-darshan-sohala-sawda-15-dec-2025


सावदा येथे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन

सावदा (ता. रावेर, जि. जळगाव) — जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नानीजधामचे परमपूज्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सावदा येथे जुना फैजपूर रोड ,रिंग रोड जवळ, शासकीय विश्रामगृहासमोर येथे करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी हा अध्यात्मिक सोहळा अनोखी पावन संधी ठरणार आहे.

सोहळ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या मंगलमय नादात आणि कलशधारी महिलांच्या   उपस्थितीत शहराच्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा होणार आहे. निशानदारी पुरुष, लेझीम पथके आणि विविध सजीव देखावे यांसह पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणुकीनंतर पादुकांना संत पिठावर विराजमान करून स्वागत-आरती व वैदिक मंत्रोच्चारात पूजन केले जाईल. पादुका पूजन हे सद्गुरूंप्रती समर्पण व श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. यानिमित्त भाविकांना सिद्ध पादुकांचे दर्शन घेऊन जगद्गुरूंच्या कृपाशीर्वादाचा लाभ मिळणार आहे. सोहळ्यादरम्यान विशेष अध्यात्मिक प्रवचन, उपासक दीक्षा आणि गुरूपूजनाचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुकांनी दीक्षेसाठी जिल्हा सेवा समितीकडे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे या सोहळ्यादरम्यान ‘दुर्बल घटक पुनर्वसन’ योजनेअंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे. देहदान–अवयवदान जनजागृती, ग्रामस्वच्छता अभियान, इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठशाळा, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, मोफत दवाखाना, तसेच महिला सक्षमीकरणासाठी मोफत शिलाई मशीन व घरघंटी वाटप असे विविध उपक्रम संस्थान सातत्याने राबवत आहे. वैद्यकीय सेवेत संस्थानचे योगदान उल्लेखनीय असून महाराष्ट्रातील विविध महामार्गांवर ५३ रुग्णवाहिका २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ मधील रक्तदान मोहिमेत १,३६,२७० रक्त कुप्या संकलनाचा विक्रम नोंदविला गेला आहे.


जगद्गुरूंच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी, तसेच सिद्ध पादुकांच्या पावन दर्शनाने स्वतःला अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील भाविकांनी, नागरिकांनी आणि श्रद्धाळूंनी सहकुटुंब-सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे कळकळीचे आवाहन रामानंद संप्रदाय जळगाव जिल्हा सेवा समितीने केले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.