Contact Banner

सावदा पालिका निवडणूक अंतिम टप्प्यात; २० रोजी प्रभाग ४-ब मतदान, २१ रोजी नगराध्यक्षांसह दहा प्रभागांचा निकाल

 

savda-palika-nivadnuk-antim-tappyat-20-roji-prabhag-4b-matdan-21-roji-nagaradhyakshasah-daha-prabhagancha-nikal

सावदा पालिका निवडणूक अंतिम टप्प्यात; २० रोजी प्रभाग ४-ब मतदान, २१ रोजी नगराध्यक्षांसह दहा प्रभागांचा निकाल

सावदा प्रतिनिधी – लेवा जगत न्यूज-नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंतिम टप्पा आता गाठला असून, संपूर्ण शहराचे लक्ष येत्या दोन दिवसांत होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. सावदा पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १ ते १० मध्ये प्रत्येकी दोन उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडून द्यायचे आहेत. यासोबतच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी दिनांक २ रोजी मतदान शांततेत पार पडले आहे. तसेच उर्वरित प्रभागांतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, निवडणूक काळातील सूचनेनुसार पुढे ढकलण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ४-ब ची निवडणूक उद्या दिनांक २० रोजी होत आहे. या मतदानानंतर दिनांक २१ रोजी संपूर्ण सावदा शहरातील दहा प्रभागांसह लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची एकत्रित मतमोजणी करण्यात येणार आहे.

मतमोजणीची प्रक्रिया पालिका सभागृहात सकाळी १० वाजेपासून सुरू होणार असून, मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, साधारणतः ४ फेऱ्यांमध्ये निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या कामकाजासाठी सुमारे ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संपूर्ण निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडेसहायक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वाढवा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सावदा पोलीस स्टेशन तर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह मतदान व मतमोजणी काळात सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत.

दरम्यान, निवडणुकीत सहभागी सर्व उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांनी कोणत्याही समाजविरोधी घोषणा न देता, शांततेत आणि कायद्याचे पालन करत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन सावदा पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे. आता २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एकत्रित मतमोजणीतून सावदा शहराच्या राजकीय चित्रावर शिक्कामोर्तब होणार असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.