15 वर्षीय मुलीचे अपहरण व लैंगिक अत्याचार; पारोळा येथील आरोपीला 20 वर्षांची शिक्षा
15 वर्षीय मुलीचे अपहरण व लैंगिक अत्याचार; पारोळा येथील आरोपीला 20 वर्षांची शिक्षा
लेवाजगत न्युज जळगाव:- 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर साहेबराव जोगी (28, रा. दगडी सबगव्हाण, ता. पारोळा) याला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या संगीताबाई गोकुळ पाटील (रा.तरडे, ता.धरणगाव) या महिलेलाही दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा विशेष जलदगती न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया-झवर यांनी सुनावली.
पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथील ज्ञानेश्वर जोगी याने 7 मार्च 2022 रोजी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. महिलेविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयासमोर झालेल्या जबाबात पीडितेने संगीताबाई पाटील हिने धमकी देऊन ज्ञानेश्वर जोगी याच्यासोबत जाण्यास भाग पाडले होते, असे सांगितले. त्यावरून या महिलेविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दोघांचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या जबाबात पीडितेने ज्ञानेश्वर याने तिला पळवून नेत तिच्यावर 7 ते 23 मार्च 2022 यादरम्यान वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले होते.
सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील अॅड. चारुलता बोरसे यांनी साक्षीपुरावे सादर करीत प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने ज्ञानेश्वर जोगी याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012चे कलम 6 अन्वये 20 वर्षे सश्रम कारावास, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी शिक्षा सुनावली तसेच अन्य दोन कलमान्वये प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी शिक्षा सुनावली. तर संगीताबाई पाटील हिला तीन तीन कलमान्वये प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून हर्षवर्धन सपकाळे व राजाराम सुरवाडे आदींनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत