Contact Banner

गुप्त माहितीवरून कारवाई : लक्झरी वाहनातून गुटख्याची तस्करी उघड


 गुप्त माहितीवरून कारवाई : लक्झरी वाहनातून गुटख्याची तस्करी उघड

८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त; तीन जण अटकेत

लेवाजगत न्युज धुळे | 23 जानेवारी 2026

धुळे तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत लक्झरी वाहनातून होणारी गुटखा तस्करी उघडकीस आणली आहे. या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला, राजश्री, रजनीगंधा व आरएमडी पान मसाल्यासह सुमारे ८ लाख १८ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर येथून श्यामोली परिवहन कंपनीच्या लक्झरी बसद्वारे (क्रमांक एम.पी. 41 ए.जे. 7444) महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार होती. त्यानुसार मुंबई–आग्रा महामार्गावरील आर्वी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत सापळा रचण्यात आला.

बुधवारी (21 जानेवारी) रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास संबंधित लक्झरी बस थांबवून तपासणी करण्यात आली. बसमधील प्रवाशांच्या बॅगांच्या शेजारी ठेवलेले पांढऱ्या गोण्यांतील गुटखा आढळून आला. तपासणीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सापडल्याने तो तत्काळ जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चालकासह संबंधित तिघांना अटक करण्यात आली असून, मूळ मालक, मॅनेजरसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी खाजगी व लक्झरी वाहनांवर लक्ष केंद्रीत करत कारवाईचा फास अधिक आवळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.