मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन एकच मिशन – शासन सेवेत समायोजनाचा निर्धार
मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन
एकच मिशन – शासन सेवेत समायोजनाचा निर्धार
लेवाजगत न्यूज | जळगाव जिल्हा प्रतिनिधी : नितीन इंगळे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, या मागणीसाठी मनरेगा राज्य संघटनेच्या वतीने यापूर्वी निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्याने अखेर दि. 23 जानेवारी 2026 (शुक्रवार) पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
निवेदनामध्ये मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर योजनांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत नियमित समायोजन करावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली होती. तसेच मनरेगा अंतर्गत S-2 Infotech कंपनीमार्फत सुरू असलेली अनधिकृत व अवैध भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी, सदर कंपनी रद्द करून त्या ऐवजी सर्व कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशन सोसायटीमार्फत नियुक्ती देऊन “समान काम – समान वेतन” धोरण लागू करावे, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे.
याशिवाय इतर विभागांप्रमाणे मनरेगा विभागाची स्वतंत्र यंत्रणा उभारून पदनिहाय आकृतीबंध तयार करावा, तसेच काही महिन्यांपासून थकीत असलेला पगार तात्काळ अदा करावा, अशा मागण्यांचाही समावेश होता. या सर्व मागण्या दहा दिवसांत मंजूर न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला होता.
मात्र शासन स्तरावरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आजपासून मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात जामनेर पंचायत समितीतील मनरेगाचे सर्व कर्मचारी सहभागी झाले असून कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. परिणामी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली विविध विकासकामे बंद पडली असून याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.
दरम्यान आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी “एकच मिशन – शासन सेवेत समायोजन” या घोषवाक्याखाली जामनेर येथे आंदोलनाची प्रतिज्ञा व सामूहिक शपथ घेण्यात आली. कोणत्याही दबावाला, आमिषाला किंवा फोडाफोडीच्या राजकारणाला बळी न पडता संघटनेप्रती प्रामाणिक राहून न्यायिक हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा संकल्प कर्मचाऱ्यांनी केला.
“मी या आंदोलनाच्या माध्यमातून माझ्या आत्मसन्मानासाठी, माझ्या मूलभूत न्यायिक अधिकारांसाठी तसेच माझ्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढेन,” अशी भावनिक शपथ यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतली. ही लढाई एखाद्या व्यक्तीची नसून मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची सामूहिक लढाई असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व
श्री. मनिष महाजन – सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटना (उपाध्यक्ष)
श्री. गणेश शिवदे – तांत्रिक पॅनल अधिकारी संघटना (उपाध्यक्ष)
श्री. समाधान मराठे – क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटना (अध्यक्ष)
तसेच जामनेर तालुका, जिल्हा जळगाव येथील मनरेगा परिवारातील इतर पदाधिकाऱ्यांनी केले.
शासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत