IND vs PAK Match : भारत–पाकिस्तान आमने-सामने, महामुकाबला कधी होणार? जाणून घ्या…
IND vs PAK Match : भारत–पाकिस्तान आमने-सामने, महामुकाबला कधी होणार? जाणून घ्या…
लेवाजगत न्यूज | मुंबई :
भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचते. दोन्ही संघ आमने-सामने आले की सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होते. आता पुन्हा एकदा IND vs PAK सामना रंगणार असून, हा महामुकाबला कधी, कुठे आणि किती वाजता होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
भारतीय क्रिकेट संघाने २०२६ अंडर-१९ विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. शेवटच्या गट सामन्यात न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव करत भारताने ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान पटकावले. आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आता सुपर सिक्समध्ये दोन सामने खेळणार आहे.
सुपर सिक्स फेरीत भारताचा सामना २७ जानेवारी रोजी झिम्बाब्वे संघाशी होणार आहे, तर त्यानंतर क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढवणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हे दोन्ही सामने बुलावायो (झिम्बाब्वे) येथे होणार आहेत. झिम्बाब्वे आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ग्रुप सी मधून सुपर सिक्समध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तान ग्रुप सी मध्ये दुसऱ्या, तर झिम्बाब्वे तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
भारत आणि पाकिस्तान शेवटचे २०२० च्या अंडर-१९ विश्वचषकात आमने-सामने आले होते. उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानचा १० विकेट्सने पराभव केला होता. २०१८ मध्येही दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडले होते, ज्यात भारताने २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. २०१२ मध्ये भारताने पाकिस्तानवर एका विकेटने विजय मिळवला होता. तर २०१० ही शेवटची वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने अंडर-१९ विश्वचषकात भारताचा पराभव केला होता.
भारतीय संघाने सुपर सिक्स फेरीत ४ गुणांसह प्रवेश केला आहे. गट टप्प्यात भारताने आपले सर्व सामने जिंकले. अमेरिकेचा ६ विकेट्सने, तर बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. मागील आवृत्तीत भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. भारताने आतापर्यंत पाच वेळा अंडर-१९ विश्वचषक जिंकत सर्वाधिक यशस्वी संघ होण्याचा मान मिळवला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत