Contact Banner

जीव वाचवण्यासाठी गवतात लपले, पण नियतीनं घेतला घात; वृद्धाचा जिवंत जळून अंत


 जीव वाचवण्यासाठी गवतात लपले, पण नियतीनं घेतला घात; वृद्धाचा जिवंत जळून अंत

लेवाजगत न्युज :-उत्तर प्रदेशच्या बाराबांकी जिल्ह्यात मधमाशांच्या हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी एक वृद्ध गवतात लपला. याच सुमारास कोणीतरी धूर करण्यासाठी गवताला आग लागली. या आगीत जिवंत जळाल्यानं वृद्धाचा मृत्यू झाला. बराच वेळ उलटूनही वृद्ध घरी न परतल्यानं कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. काही वेळानंतर वृद्धाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत गवतात सापडला. यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.


हैदरगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोतावन पुरवा गावात ७० वर्षीय रामअवतार ऊर्फ फफ्फड यांचा मंगळवारी जिवंत जळून मृत्यू झाला. रामअवतार यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. त्यांचं कुटुंब पत्र्याच्या घरात राहतं. जंगली गवतापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची विक्री करुन रामअवतार कुटुंबाचं पोट भरायचे.


मंगळवारी दुपारी रामअवतार जंगली गवत गोळा करायला गेले होते. परतत असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. रौनी गावाजवळ मधमाशांनी रामअवतार यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी रामअवतार रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगली गवतात लपले. याच सुमारास कोणीतरी मधमाशांना पळवून लावण्यासाठी गवताला आग लावली आणि तिथून पळ काढला.


संध्याकाळ उलटून रात्र होत आली तरी रामअवतार घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. काही वेळानंतर रामअवतार यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृतदेहाचा जळून अक्षरश: कोळसा झाला होता. रामअवतार यांच्या मृत्यूनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


रामअवतार यांच्या निधनानं त्यांच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. 'ते सकाळीच माझ्यासाठी बाबा टिकाराम धाम येथे भरलेल्या जत्रेतून माझ्यासाठी कुंकू घेऊन आले होते. दुपारी १२ च्या सुमारास ते घरी आले. कुंकू घरात ठेवून ते जंगलात गवत आणायला गेले. लवकरच घरी येतो, असं सांगून ते गेले होते,' अशी आठवण सांगताना रामअवतार यांची पत्नी धाय मोकलून रडली. या प्रकरणी अद्याप तरी पोलिसांना कोणतीही तक्रार मिळालेली नाही. तक्रार मिळाल्यास कारवाई करु, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.