खान्देशचा झेंडा थेट बिगबॉस मराठी ६ मध्ये अहिराणीचा सुपरस्टार सचिन विठ्ठल कुमावत यांची ऐतिहासिक एंट्री
खान्देशचा झेंडा थेट बिगबॉस मराठी ६ मध्ये
अहिराणीचा सुपरस्टार सचिन विठ्ठल कुमावत यांची ऐतिहासिक एंट्री
लेवाजगत न्यूज शेंदुर्णी ता. जामनेर (सा.वा)–
कलर्स मराठीवरील बहुचर्चित रिअॅलिटी शो ‘बिगबॉस मराठी – सिझन ६’ मध्ये खान्देशच्या भूमीतून निघालेल्या कलाकाराने थेट महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या मंचावर उडी घेत इतिहास रचला आहे. अहिराणी भाषेला राज्यभर नवसंजीवनी देणारा खान्देशचा आवाज – सचिन विठ्ठल कुमावत यांनी काल (११ जानेवारी) भव्य उद्घाटन सोहळ्यात बिगबॉसच्या घरात प्रवेश केला आणि संपूर्ण खान्देशचा अभिमान वाढवला.
अभिनेता रितेश देशमुख यांच्या होस्टिंगमध्ये सुरू झालेल्या या सीझनच्या पहिल्याच दिवशी सचिन कुमावत यांच्या दमदार एन्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातून आलेला कलाकार आत्मविश्वासाने, अहिराणी भाषेच्या अभिमानासह मंचावर उभा राहिल्याने सोशल मीडियावरही त्यांची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिपंढरपूर नगरी शेंदुर्णी सारख्या ग्रामीण भागातून घरचे कोणतेही नेतृत्व नसताना स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गावामध्ये साध्या पद्धतीने वावरणाऱ्या सचिनने आजही मित्रपरिवाराशी, गावाशी तीच नाळ जुळवुन ठेवली आहे.
सन २००५ मध्ये श्रीकृष्ण चौधरी सर निर्मित ‘आरं दाजीबा’ या पहिल्या अल्बमपासून संगीत क्षेत्रात प्रवास सुरू करणाऱ्या सचिन कुमावत यांनी गेल्या दोन दशकांत खान्देशी लोककलेला आधुनिक व्यासपीठावर नेले. "हाई बालंगी इना बालंगापना", ‘केसांवर फुगे’, ‘लगनमा मचाडू धूम’, ‘सावन महिना मा’, ‘पोरी तुना गजरा’, ‘वाडी वाडी चंदन वाडी’, ‘टमटम’, ‘मनी डार्लिंग’, ‘मामी तुमची मुलगी लय सुंदर’, ‘खान्देशनी जत्रा’ यांसारखी असंख्य गाणी त्यांची सुपरहिट झाली .
विशेष म्हणजे ‘केसांवर फुगे’ या गाण्याने यूट्यूबवर २८७ मिलियनहून अधिक Views मिळवत अहिराणी-मराठी संगीताचा नवा इतिहास रचला. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलला एकूण १.२ बिलियन (१२० कोटींहून अधिक) Views मिळाले असून त्यांचे २२ लाख सबस्क्राईबर आहेत. ग्रामीण भागातून एवढे मोठे डिजिटल यश मिळवणारा तो पहिलाच खान्देशी कलाकार ठरला आहे.
२५० पेक्षा अधिक लाईव्ह स्टेज शो, ५०० हून अधिक खान्देशी-अहिराणी व्हिडिओ अल्बम, तसेच Music Marathi, 9X Marathi, मायबोली या वाहिन्यांवर सातत्याने सादरीकरण असा त्यांचा कलात्मक प्रवास आज बिगबॉसच्या घरात पोहोचला आहे. लवकरच प्रदर्शित होणारा “ज्याची करावी कीव तोच घेतो जीव” हा त्यांचा आगामी चित्रपटही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.
सचिन कुमावत यांना त्यांच्या कार्यासाठी खान्देश भूषण, गिरणा गौरव, गोदा सन्मान, महाराष्ट्राचा रिल स्टार अवॉर्ड यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. आता बिगबॉस मराठी सारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर प्रवेश केल्याने त्यांच्या यशात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
आज सचिन कुमावत यांची ही एंट्री केवळ एका कलाकाराची कामगिरी नसून, संपूर्ण खान्देश व ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रतिभेचा विजय मानली जात आहे.
अशा या हरहुन्नरी आपल्या मातीतील कलाकाराला वेळोवेळी मतदानाच्या माध्यमातून सर्वांनी सपोर्ट करावा असे आवाहन त्यांच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत