Contact Banner

खासगी शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यात खळबळ; आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात

 

khasgi-shikvanila-janarya-don-alpavayin-vidyarthinina-vihirit-feklyachi-dhakkadayak-ghatna-bhusaval-taluka-aropi-polisancha-tabyat


खासगी शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना

भुसावळ तालुक्यात खळबळ; आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. खासगी शिकवणीला जाणाऱ्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत फेकून दिल्याची भयंकर घटना भुसावळ तालुक्यातील साकरी गावात मंगळवारी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव रोहन चौधरी असे असून, पीडित मुली नेहमीप्रमाणे सकाळी गावातून खासगी शिकवणीसाठी निघाल्या होत्या. गावाजवळील एका शेतालगत पोहोचताच, दबा धरून बसलेल्या आरोपीने अचानक दोघींवर हल्ला केला. त्याने जबरदस्तीने त्यांना जवळच असलेल्या विहिरीपर्यंत नेले व दोघींनाही विहिरीत फेकून दिले.

हा प्रकार घडत असताना मुलींनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच दुसऱ्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी तात्काळ धाव घेत गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले.

गावकऱ्यांनी तात्काळ दोरखंड व शिडीच्या साहाय्याने मुलींना विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. हे वृत्त लिहीपर्यंत बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपी रोहन चौधरी याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

आरोपीने असे विकृत कृत्य का केले, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हे प्रकरण जुन्या वादातून, एकतर्फी प्रेमातून किंवा अन्य कोणत्या कारणामुळे घडले का, याबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.