महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांतील महापौर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर; राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांतील महापौर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर; राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित
लेवाजगत न्यूज मुंबई -राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर निवडीकडे लागले आहे. महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, ही सोडत मुंबईतील नगरविकास विभागातर्फे काढण्यात येणार आहे.
गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) मंत्रालयात सोडत
महापौर पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी महाराष्ट्र नगरविकास विभागाकडून येत्या गुरुवारी, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.
भाजपाचा दबदबा; महायुतीचे वर्चस्व
यंदाच्या महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. २९ पैकी तब्बल २४ महानगरपालिकांमध्ये भाजप व महायुतीने सत्ता मिळवली असून, यापैकी ९ ठिकाणी भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवून विजय मिळवला आहे.
या अभूतपूर्व यशानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले,
“विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेकडे गेलो आणि जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिला. विविध महापालिकांमधील विक्रमी यशातून लोकांना विकास आणि प्रामाणिक कारभार हवा आहे, हे स्पष्ट होते.”
विरोधकांचे आरोप
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेने निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा व पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील मतमोजणीवेळी वापरण्यात आलेल्या ‘पाडू’ मशीनवरही विरोधकांनी आक्षेप नोंदविला होता.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढले, मात्र सत्ता मिळवण्यात त्यांना अपयश आले. या दोन्ही ठिकाणी भाजपाने विक्रमी कामगिरी करत सत्ता काबीज केली असून, यामुळे यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर, नागपूर व जळगावातील निकाल ठळक
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले असून, तेथे एमआयएम पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
नागपुरात सलग चौथ्यांदा भाजपाचे कमळ फुलले आहे, तर चंद्रपुरात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत विक्रमी जागा जिंकल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे जळगाव महानगरपालिकेत भाजपाचा स्ट्राईक रेट १०० टक्के राहिला असून, लढवलेल्या सर्व जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे.
लातूरचा गड काँग्रेसकडे, अकोल्यात त्रिशंकू स्थिती
लातूर महानगरपालिकेतील काँग्रेसचा गड कायम राहिला आहे. अकोला महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने तेथे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी काढली जाणार असल्याने, कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत