महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील सोनारी येथे महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर तालुक्यातील सोनारी गावात आज सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास महावितरण कर्मचाऱ्यावर धक्कादायक हल्ल्याची घटना घडली. महावितरणचे कर्मचारी सतीश भागवत परदेशी हे थकीत वीजबिल वसुली व अनधिकृत वीज कनेक्शन बंद करण्यासाठी सोनारी येथे गेले होते.
दरम्यान, गावातील ईश्वर रामदास माळी यांचे वीज कनेक्शन अनधिकृत असल्याचे आढळून आल्यानंतर कर्मचारी परदेशी यांनी नियमानुसार ते कनेक्शन कट केले. मात्र या कारवाईचा राग मनात धरून ईश्वर माळी व रामदास माळी यांनी कर्मचाऱ्यावर दगडफेक करत मारहाण केली. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे शासकीय कामात गंभीर अडथळा निर्माण झाला असून, महावितरण कर्मचाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत