Contact Banner

रोझोदा येथे आजपासून दोन दिवस कामसिद्ध महाराजांची यात्रा


rozoda-yethe-aajpasun-don-divas-kamsiddha-maharajanchi-yatra


रोझोदा येथे आजपासून दोन दिवस कामसिद्ध महाराजांची यात्रा

लेवाजगत प्रतिनिधी सावदा-

रावेर तालुक्यातील रोझोदा येथे आज शुक्रवार, ३१ जानेवारीपासून शनिवार, १ फेब्रुवारीपर्यंत कामसिद्ध महाराजांची (कामदेव)  यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. यात्रेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे माघ शुद्ध पौर्णिमेला ही पारंपरिक यात्रा भरते. दोन दिवस चालणारी ही यात्रा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून सुरू असून, त्या काळी यात्रेसाठी विशेष सनद व वर्षासनाची व्यवस्था होती, अशी ऐतिहासिक नोंद आहे. यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यासह राज्य व देशाच्या विविध भागांतून भाविक नवस फेडण्यासाठी रोझोदा येथे दाखल होत असतात.

यात्रेच्या मुख्य दिवशी देवकाठीवरील ध्वजाचे नूतनीकरण करण्यात येते. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील भगतांकडून देवकाठीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर वाजत-गाजत काठीची भव्य मिरवणूक काढून संपूर्ण गावाची ग्रामप्रदक्षिणा घालण्यात येते. जुना ध्वज उतरवून नवीन ध्वज उंच काठीवर आरोहित करण्याचा विधी केला जातो. या धार्मिक विधीस ‘नवरथ विधी’ असे म्हटले जाते.

यात्रोत्सवाच्या काळात विविध वस्तू, खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने थाटली जात असून, त्यासाठी विक्रेत्यांची तयारी पूर्ण झाली आहे. कामसिद्ध महाराज देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे इतर मंदिरांप्रमाणे कोणतेही व्यासपीठ अथवा धातू, दगड किंवा अन्य कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही. या ठिकाणी केवळ स्वयंभू बाणा असून, भाविक त्याचे दर्शन घेतात.

यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष टेनुदास फेगडे, सचिव वसंत बोंडे तसेच श्रीराम व कामसिद्ध महाराज देवस्थान विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.