सकल लेवा युवती व महिलांचे २५ जानेवारीला राज्यस्तरीय अधिवेशन
सकल लेवा युवती व महिलांचे २५ जानेवारीला राज्यस्तरीय अधिवेशन
लेवाजगत न्यूज जळगांव प्रतिनिधी |
महिलांना साक्षर करणे, कौटुंबिक समस्या दूर करणे, महिलांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागृती निर्माण करणे तसेच समाजातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सकल लेवा युवती व महिलांचे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन २५ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, लोकसेवक माननीय मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जुना खेडी रोड, जळगाव येथे होणार आहे, अशी माहित पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या अधिवेशनात खान्देश, विदर्भ, पुणे, मुंबई व परिसर, मराठवाडा, नाशिक, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा एकूण ८ विभागांतील युवती व महिला सहभागी होणार आहेत. कोणतीही भाषणबाजी न करता, प्रमुख महिला पाहुण्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडणार असून ९० टक्के महिला वक्त्या समाजातील महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
अधिवेशनात निश्चित केलेल्या विषयांवर वर्षभर कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे हे राज्यातील पहिले महिला अधिवेशन असून, पुढील काळात ते दरवर्षी घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांसाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. समाजातील व्यक्तींच्या एकत्रित सहभागातून लोकवर्गणीद्वारे हे अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे.
जळगाव येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनात अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले. पत्रकार परिषदेस लेवा पाटीदार समाजातील पदाधिकारी व महिला सदस्या उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत