समाजप्रबोधनाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा जागर गोविंद महाराजांच्या भारुडातून सामाजिक वास्तवावर घणाघाती प्रहार
समाजप्रबोधनाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा जागर
गोविंद महाराजांच्या भारुडातून सामाजिक वास्तवावर घणाघाती प्रहार
लेवाजगत न्युज भडगाव :-
महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने व स्व. बापुजी फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय, भडगाव येथे समाजप्रबोधनात्मक भारूडाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला.
प्रसिद्ध समाजप्रबोधक गोविंद महाराज यांनी आपल्या प्रभावी भारूडातून भ्रष्टाचार, दांभिकता, सामाजिक विषमता, अंधश्रद्धा तसेच राजकीय उदासीनतेवर परखड शब्दांत प्रहार केला. भारूडाच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना प्रश्न विचारण्याची जाणीव करून देत “लोकशाहीत मतदार हा केवळ मत देणारा नसून सत्तेचा राखणदार आहे” हा ठळक संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने होते. त्यांच्या हस्ते आमदार किशोर पाटील यांचे पुत्र व पाचोरा गटनेते सुमित पाटील, भडगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा प्रदीप मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, गटनेते लखीचंद प्रकाश पाटील, ट्रेन लाईव्हचे संपादक दिलीप पाटील तसेच समाजप्रबोधक गोविंद महाराज यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात हेमंत अलोने म्हणाले की, “अनेक पत्रकार संघांचे कार्यक्रम हे पत्रकारांपुरते मर्यादित असतात. मात्र भडगाव तालुका पत्रकार संघ दरवर्षी समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबवून सामान्य नागरिकांना विचारप्रवण करतो. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक प्रबोधनासाठी एकत्र येतात, ही लोकशाहीसाठी आशादायी बाब आहे.”
भडगाव तालुका पत्रकार संघाने केवळ बातम्यांपुरती भूमिका न ठेवता समाजाच्या वैचारिक उन्नतीसाठी सक्रिय सहभाग घेतल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. पत्रकारितेच्या सामाजिक दायित्वाचा वसा जपत उभारलेला हा प्रबोधनाचा मंच उपस्थितांमध्ये दीर्घकाळ विचारांची ठिणगी पेटवणारा ठरला.
कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार संघ व भडगाव तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या समाजजागृतीच्या उपक्रमामुळे भडगावमध्ये प्रबोधनाची चळवळ अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत