सावदा उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत सदस्यपदाची १३ रोजी निवड
सावदा उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत सदस्यपदाची १३ रोजी निवड
लेवाजगत न्यूज सावदा : सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसंदर्भातील हालचालींना वेग आला असून, उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत सदस्यपदाची निवड येत्या दि. १३ जानेवारी रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (युती) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. निवडणूक निकालानंतर विविध पक्षांनी व अपक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली गटनोंदणी केली असून, नियमाप्रमाणे निकालानंतर साधारण २५ दिवसांच्या आत पहिली सभा घेणे आवश्यक असल्याने ही विशेष सभा दि. १३ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड होणार असून, त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. एकूण सदस्यसंख्येनुसार साधारण ७ ते ८ सदस्यांमधून १ स्वीकृत सदस्य निवडला जाणार असल्याने कोणाला संधी मिळते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
दरम्यान, या निवड प्रक्रियेत विविध पक्षांकडून इच्छुकांची नावे पुढे येत असून, भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष गटांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व जिल्हा संघटनांशी संबंधित काही नावेही चर्चेत असल्याचे समजते.
शहरातील नागरिकांचे लक्ष या विशेष सभेकडे लागले असून, उपनगराध्यक्षपद व स्वीकृत सदस्यपद कोणाच्या गळ्यात पडते, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. त्यामुळे दि. १३ जानेवारीची ही सभा सावदा शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत