प्रेमप्रकरणातून तरुण व अल्पवयीन मुलीची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या; राधानगरी तालुक्यात खळबळ
प्रेमप्रकरणातून तरुण व अल्पवयीन मुलीची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या; राधानगरी तालुक्यात खळबळ
राधानगरी | प्रतिनिधी
प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या नैराश्यातून राधानगरी तालुक्यातील तरसंबळे (ता. राधानगरी) येथील जंगल परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेळेवाडी येथील ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय 28) आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही दुर्दैवी घटना किमान चार दिवसांपूर्वी घडली असावी. मृतदेहांमधून दुर्गंधी येत असल्याने आत्महत्येला काही दिवस उलटल्याचे स्पष्ट झाले. राधानगरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरसंबळे गावचे पोलिस पाटील गुरुनाथ गणपती कांबळे यांना आज सकाळी धामोड–दुर्गमानवाड रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर जंगलात संशयास्पद मृतदेह असल्याची माहिती मिळाली. खात्री करण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्यानंतर एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण आणि अल्पवयीन मुलीचे मृतदेह आढळून आले. विशेष म्हणजे दोघेही एकाच दोरीने एकत्र बांधलेले होते.
याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जठार यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
कष्टाळू तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
ओंकार बरगे हा शेळेवाडी गावात कष्टाळू, मनमिळाऊ तरुण म्हणून परिचित होता. बिद्री साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर त्याच्याकडे होता. गावातील यात्रोत्सवात शंभर किलोची गुंडी उचलून क्रीडा कौशल्य दाखवण्याचा त्याचा उत्साह आजही ग्रामस्थांच्या आठवणीत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. तर अल्पवयीन मुलगी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती.
प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिस तपासात समोर आला आहे. या घटनेमुळे शेळेवाडी व तरसंबळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत