Contact Banner

लग्नास नकार दिल्याने भररस्त्यात तरुणीची हत्या; आरोपी रफीकने नंतर आत्महत्या केल्याची शक्यता


 लग्नास नकार दिल्याने भररस्त्यात तरुणीची हत्या; आरोपी रफीकने नंतर आत्महत्या केल्याची शक्यता

लेवाजगत न्युज यल्लापूर (उत्तर कन्नड):- 

लग्नास नकार दिल्याच्या रागातून संतप्त झालेल्या रफीक याने घटस्फोटीत तरुणी रंजिता हिची शनिवारी भररस्त्यात निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यल्लापूर तालुक्यात घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी रफीक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांच्या शोध मोहिमेदरम्यान काळम्मनगर वनक्षेत्रात एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून तो आरोपी रफीकचाच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

मृत रंजिता हिने सुमारे दहा वर्षांपूर्वी पतीपासून घटस्फोट घेतला होता. ती यल्लापूर येथे आई-वडील, भाऊ आणि मुलासह राहत होती. उपजीविकेसाठी ती एका सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन सहायिका म्हणून कार्यरत होती. रफीक व रंजिता हे शालेय जीवनापासून एकाच वर्गात शिकलेले होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि कुटुंबांमध्येही घनिष्ठ संबंध असल्याची माहिती आहे.

रफीक अनेकदा रंजिताच्या घरी येत असे व तिच्या कुटुंबासोबत जेवणही करत होता. मात्र, अलीकडे तो रंजितावर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होता. रंजिताने स्पष्ट नकार दिल्याने तो संतप्त झाला.

शनिवारी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना रफीकने रंजिताला रस्त्यात अडवले आणि पुन्हा लग्नाचा प्रस्ताव मांडला. तिने नकार दिल्यानंतर रागाच्या भरात रफीकने चाकूने वार करून तिची जागीच हत्या केली व तो घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, हत्येच्या आदल्या रात्री आरोपी रफीक व मृत रंजिताचा भाऊ हे मित्र असल्याने दोघेही एकत्र पार्टी करत होते, अशी माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, हिंदू तरुणीच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व्हीएचपीसह विविध हिंदू संघटनांनी यल्लापूर बंदची हाक दिली होती. शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बसवेश्वर सर्कल येथे आंदोलनाची तयारी सुरू होती. आरोपी अटकेत येईपर्यंत रंजिताचा अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा संघटनांनी घेतला होता.

मात्र, या सर्व घडामोडींच्या दरम्यान आरोपी रफीकने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेमुळे यल्लापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.