अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून गोळीबार; प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून गोळीबार; प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी चोपडा - तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीवर गोळी झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरी अनिता जगदीश पाटील (वय ४०) आणि देवा सुरेश धनगर (वय ४०) यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आले. ही घटना २८ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. जगदीश पाटील यांची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने घरात दोघांचेही मृतदेह पाहिले. तिने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना माहिती दिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, अनिता पाटील आणि देवा धनगर यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून अनिता यांनी देवा यांना वेळ देत नसल्याने तो संतप्त झाला होता. रागाच्या भरात देवा धनगर हा अनिता यांच्या घरी गेला. त्याने गावठी पिस्तूलाने अनिता यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब घोलप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे हे अप्पासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या या घटनेमुळे अकुलखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत