पौर्णिमा दर्शन महोत्सव व नरनारायण देव जयंतीनिमित्त फुल दोलोत्सवाचे आयोजन
पौर्णिमा दर्शन महोत्सव व नरनारायण देव जयंतीनिमित्त फुल दोलोत्सवाचे आयोजन
लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर, जि. जळगाव) -:वडताल धाम अंतर्गत असलेल्या सावदा येथील पुरातन श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे येत्या २ मार्च २०२६ रोजी पौर्णिमेनिमित्त विशेष दर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दर महिन्याप्रमाणे यंदाही पौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मोठ्या संख्येने हरिभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
३ मार्च २०२६ रोजी ग्रहण असल्यामुळे नियमित पौर्णिमा दर्शन सोहळा आदल्या दिवशी म्हणजेच २ मार्च रोजीच साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच ४ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी पाच वाजता मंदिर परिसरात नरनारायण देव जयंतीनिमित्त मंदिरात पारंपरिक पद्धतीने “फुल दोलोत्सव” उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट, सुगंधी फुलांची आरास, भजन-कीर्तन तसेच विशेष आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. भक्तिमय वातावरणात भगवान नरनारायण देवांच्या मूर्तींना विविधरंगी फुलांनी सजवून दोलोत्सव साजरा करण्यात येईल.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी, धर्म किशोर दासजी, पुजारी सत्यप्रकाश दासजी तसेच व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व पुरुष व महिला हरिभक्तांना करण्यात आले आहे.
सावदा परिसरासह रावेर तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत