अंबाझरी तलावात पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या; कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय
अंबाझरी तलावात पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या; कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय
लेवाजगत न्युज | नागपूर:
अंबाझरी तलाव येथे पोलिस कॉन्स्टेबलने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शीलरत्न भीमराव बेलेकर (वय ४५, रा. वाघदरा, इसासनी) असे मृताचे नाव असून ते प्रतापनगर पोलिस ठाणे येथे कार्यरत होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा पत्नीसोबत वाद सुरू होता. त्यांचा मुलगा आठवीत तर मुलगी चौथीत शिकते. दोन्ही मुलांचा ताबा शीलरत्न यांच्याकडे होता. मुलांच्या ताब्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.
१९ फेब्रुवारीपासून ते ड्युटीवर गैरहजर होते. रविवारी दुपारी ते त्यांचे भाऊ अजय भीमराव बेलेकर (रा. कामगार कॉलनी) यांच्याकडे आले होते. काही वेळानंतर ते घराबाहेर पडले; मात्र त्यानंतर त्यांचा कुठलाही संपर्क झाला नाही. अजय यांनी बेपत्ता असल्याची तक्रार प्रतापनगर पोलिसांत नोंदवली होती.
दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना मंगळवारी सकाळी अंबाझरी तलावात एक मृतदेह तरंगताना दिसला. माहिती मिळताच अंबाझरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. सततची ड्युटी, वाढता कामाचा ताण, अपुरी विश्रांती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक पोलीस कर्मचारी मानसिक तणावाला सामोरे जात असल्याचे वारंवार दिसून येत आहे. राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना कार्यरत कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने दलातील मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन, तणावमुक्ती उपक्रम आणि मानसिक आरोग्य सहाय्य व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत