Contact Banner

सावदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष सावदा मंडळाकडून निवेदन सादर

 

savda-grameen-rugnalayat-shavvichhedan-suvidha-suru-karanyachi-magni-bjp-savda-mandalakdun-nivedan-sadar

सावदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा सुरू करण्याची मागणी
भारतीय जनता पक्ष सावदा मंडळाकडून निवेदन सादर

लेवाजगत न्युज सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ शवविच्छेदन (पोस्टमार्टम) सुविधा सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सावदा मंडळाच्या भारतीय जनता पक्षतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन सांगळे यांना देण्यात आले.

ता. रावेर येथील सावदा शहरात उभारण्यात आलेले अत्याधुनिक राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय येथे नियमित बाह्यरुग्ण तपासणी सुरू असल्याने शहर व परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. मात्र, सावदा व परिसरात वाढत्या अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी लांब अंतरावरील अन्य शासकीय रुग्णालयात न्यावे लागते. तसेच स्थानिक पोलिसांनाही पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेथे जावे लागत असल्याने वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होतात.

यापूर्वी हे रुग्णालय नगरपरिषदेच्या अंतर्गत असताना येथे शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध होती. सध्या देखील रुग्णालयात स्वतंत्र शवविच्छेदन गृह उभारलेले असून आवश्यक डॉक्टरही उपलब्ध असल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात ही सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही ती कार्यान्वित नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सदर मागणीच्या निवेदनावर सावदा मंडळ अध्यक्ष दुर्गादास पाटील व सरचिटणीस महेश अकोले यांच्या स्वाक्षऱ्या असून, यावेळी जगदीश पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.