Contact Banner

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा कहर; रायमोहा येथे ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या



 बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा कहर; रायमोहा येथे ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या

परिसरात खळबळ ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, सोमवारी पहाटे शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरात एका ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृत तरुणाचे नाव गुड्डू तांबोळी (वय अंदाजे ३० वर्षे, रा. रायमोहा, ता. शिरूर कासार) असे आहे. ही घटना शिरूर कासार व पाटोदा या दोन पोलीस ठाण्यांच्या सीमेवर असलेल्या रायमोहा गावातील डोंगर देवी शिवारात घडली. प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गुड्डू तांबोळी यांच्यावर हल्ला केला. अत्यंत क्रूरपणे त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली.

घटनास्थळी पोलीस व फॉरेन्सिक लॅब दाखल

सकाळच्या सुमारास परिसरातून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास रक्ताने माखलेला मृतदेह आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच शिरूर कासार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

तपासाला गती देण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी रक्ताचे नमुने व अन्य महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय

बीड जिल्ह्यात मागील काही काळापासून हत्येच्या व गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रायमोहा गाव दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येत असल्याने गुन्हेगारांना याचा फायदा होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, जुना वाद होता की अन्य काही कारण, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

आरोपींना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच आरोपी जेरबंद करण्यात येतील, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.