चेन्नईतील समुद्र दुर्घटना : महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू, पाळधीचा युवक अद्याप बेपत्ता
चेन्नईतील समुद्र दुर्घटना : महाराष्ट्रातील तरुणीचा मृत्यू, पाळधीचा युवक अद्याप बेपत्ता
१५ दिवसांपूर्वीच इंटर्नशिपसाठी निवड; शोधकार्य सुरू
जळगाव/नागपूर/चेन्नई, प्रतिनिधी : चेन्नई येथील गोल्डन बीच परिसरात समुद्रात बुडाल्याने महाराष्ट्रातील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील २१ वर्षीय युवक अद्याप बेपत्ता आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी तामिळनाडू प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
नागपूर येथील रहिवासी व आयटी कंपनीत कार्यरत असलेली मधुरी चौधरी ही तरुणी सहकाऱ्यांसोबत चेन्नईतील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेली होती. सुमारे २६ जणांचा हा गट समुद्रकिनारी असताना त्यापैकी तिघे जण पाण्यात उतरले. त्यावेळी अचानक उसळलेल्या प्रचंड लाटांमुळे तिघेही समुद्राच्या आत ओढले गेले. उपस्थितांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी व बचाव पथकाने धाव घेतली. त्यात राज केदारी या तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले; मात्र मधुरी चौधरी हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
याच घटनेत जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) येथील जय नरेंद्र पाटील (वय २१) हा युवक बेपत्ता आहे. जय हा अभियांत्रिकी पदवीधर असून चेन्नईतील ‘कॉग्निझंट’ कंपनीत इंटर्नशिपसाठी त्याची निवड झाली होती. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याने रुजू होऊन कामास सुरुवात केली होती. शनिवारी सुट्टी असल्याने तो मित्रांसह समुद्रकिनारी गेला होता. सकाळी घरच्यांशी फोनवर संपर्क साधल्यानंतर काही वेळातच त्याचा मोबाईल बंद लागला. संध्याकाळी चेन्नई पोलिसांनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
रविवारी दिवसभर जयचा शोध सुरू होता; मात्र उशिरापर्यंत तो सापडलेला नव्हता. किनारपट्टी परिसरात स्थानिक प्रशासन, पोलीस व आपत्कालीन पथकांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. समुद्रातील भरती-ओहोटी आणि लाटांचा वेग यामुळे शोधकार्याला अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जय पाटील हा पाळधी येथील रहिवासी असून त्याचे वडील शेतकरी तर आई शिक्षिका आहेत. त्याच्या बहिणीची बारावीची परीक्षा सुरू असल्याने कुटुंबीयांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. जयच्या नातेवाइकांनी तातडीने चेन्नईकडे धाव घेतली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री यांनी तामिळनाडू प्रशासनाशी संपर्क साधून शोध व बचावकार्याबाबत माहिती घेतली असून आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित यंत्रणांना समन्वय राखून कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दक्षता बाळगावी, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत