शिक्षण क्षेत्राला काळीमा! घाटंजीत मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
शिक्षण क्षेत्राला काळीमा! घाटंजीत मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
लेवाजगत न्युज घाटंजी:-
घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी किशोर मालवीय (वय ५०) याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक विद्यार्थिनीला वारंवार त्रास देत होता आणि बोलावल्यावर भेटायला येण्याची धमकी देत होता. ५ फेब्रुवारी रोजी त्याने विद्यार्थिनीला फोन करून रात्री गावच्या बसस्थानकावर भेटण्यास भाग पाडले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने बसस्थानक गाठल्यावर आरोपी आपल्या चारचाकी वाहनात बसलेला होता. त्याने परिस्थितीचा फायदा घेत वाहनातच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर विद्यार्थिनीने कशीबशी सुटका करून घरी पोहोचत रडत सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपीने मे २०२५ मध्येही शाळेच्या डिजिटल खोलीत बोलावून विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तक्रार मिळताच घाटंजी पोलिसांनी पथक पाठवून यवतमाळ येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२), ६५ (१), ३५१ (३) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून घटनेत वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत