Contact Banner

जळगाव : उन्हाची चाहूल लागताच लिंबू शंभरीपार; आवक घटल्याने दरात झपाट्याने वाढ



जळगाव : उन्हाची चाहूल लागताच लिंबू शंभरीपार; आवक घटल्याने दरात झपाट्याने वाढ

लेवाजगत न्युज जळगाव : जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपासून तापमानात वाढ होत असल्याने किरकोळ बाजारात लिंबाचे दर चांगलेच वधारले आहेत. बाजारात लिंबाची आवक कमी होत असताना सरबत विक्रेते, रसवंती गृहे, हॉटेल व्यवसायिक तसेच घरगुती ग्राहकांकडून मागणी वाढल्याने लिंबू शंभरीपार गेले आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबू महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येऊ लागला आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला उपबाजारात सध्या लिंबाची दैनंदिन सरासरी आवक केवळ पाच ते सहा क्विंटलपर्यंत मर्यादित आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी घाऊक बाजारात दर्जानुसार लिंबाला किमान ८,००० रुपये, कमाल १०,००० रुपये तर सरासरी ९,००० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.

घाऊक बाजारातील दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारात स्पष्ट दिसत आहे. शहरातील भाजी बाजारात सध्या लिंबू पाच रुपये नगाने विक्री होत असून काही ठिकाणी आकारानुसार सहा ते सात रुपये नगानेही दर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे घाऊक बाजारात खरेदीचा दबाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव बाजार समितीत लिंबाची आवक प्रामुख्याने एरंडोल, धरणगाव आणि भडगाव तालुक्यांतून होते. मात्र हवामानातील बदलांचा फुलोऱ्यावर परिणाम झाल्याने यंदा उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तापमानात सातत्याने वाढ झाल्यास झाडांवरील फळगळ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत आवक आणखी घटू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

लिंबू हे दैनंदिन वापरातील महत्त्वाचे फळ असल्याने दरवाढीचा थेट परिणाम घरगुती वापर, धार्मिक विधी, हॉटेल व्यवसाय तसेच रस्त्यावरील लिंबूपाणी विक्रेत्यांवर जाणवत आहे. मागणी-पुरवठ्यातील तफावत कायम राहिल्यास पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबू आंबट ठरत असल्याची चर्चा बाजारपेठेत रंगू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.