Contact Banner

कबड्डीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो-खोमध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

 

kabaddit-shivaji-polytechnic-sangola-ani-kho-kho-madhe-shri-siddheshwar-mahila-polytechnic-solapur-vijete

कबड्डीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो-खोमध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते
गोदावरी तंत्रनिकेतन, जळगावात राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

लेवाजगत न्यूज जळगाव :-
आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना (आयईडीएसएसए) यांच्या वतीने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय (तंत्रनिकेतन) येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास शहराच्या महापौर दीपमाला काळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी डॉ. वर्षा पाटील (सचिव, गोदावरी फाउंडेशन), डॉ. पराग पाटील (प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन जळगाव) आणि डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य, गोदावरी तंत्रनिकेतन) हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश, नियोजन आणि खेळाडूंना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती दिली. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडास्पर्धांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. महापौर दीपमाला काळे यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनातील क्रीडा संस्कारांचे महत्त्व स्पष्ट करत खेळात प्रगतीचे आवाहन केले. डॉ. पराग पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी राज्यभरातून आलेल्या संघांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

मुंबई, रायगड, नाशिक, पालघर, सोलापूर, सांगोला, चांदवड, चंद्रपूर, संगमनेर, सांगली, अंबड, जालना, इंदापूर, पुणे, अहिल्यानगर आणि लातूर अशा विविध जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदवला. कबड्डी व खो-खो या दोन्ही स्पर्धांमध्ये चुरशीचे सामने रंगले.

पारितोषिक वितरण उत्साहात

समारोपप्रसंगी विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्याच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले. सूत्रसंचालन प्रा. नेहा चौधरी व प्रा. वैष्णवी नारखेडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. दीपक झांबरे, डॉ. जयंत जाधव, प्रा. दीपेश भुसे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

कबड्डी स्पर्धेतील विजेते

कबड्डी स्पर्धेत यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

खो-खो स्पर्धेतील विजेते

खो-खो स्पर्धेत यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर शासकीय निवासी महिला पॉलिटेक्निक, तासगाव यांनी उपविजेतेपद पटकावले.

राज्यभरातील विद्यार्थिनींच्या सहभागामुळे या स्पर्धांना विशेष रंगत प्राप्त झाली असून जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेत या आयोजनाची उल्लेखनीय नोंद झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.