मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर विवरे येथे कवयित्री सुनिता सुरवाडे यांच्या काव्यसंग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा
मराठी साहित्यविश्वात दोन नव्या काव्यसंग्रहांची भर
विवरे येथे कवयित्री सुनिता सुरवाडे यांच्या काव्यसंग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा
लेवाजगत न्यूज विवरे (ता. रावेर) :
मराठी साहित्याच्या दालनात दोन दर्जेदार काव्यसंग्रहांची भर पडली असून, शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी उपशिक्षिका श्रीमती सुनिता सुरवाडे उर्फ विजयसुता यांच्या ‘मूक सावलीची साथ’ व ‘भावना एक सागर’ या काव्यसंग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील होते, तर रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र आठवले यांच्या हस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी किरण प्रकाश, प्रा. नीता पाटील, सौ. संध्या भोळे, ॲड. निखिल पाटील, ॲड. विजय चौधरी, ॲड. समीर वाल्हे, अभय शिंदे, वासुदेव नरवाडे व सुभाष नरवाडे आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व रमाबाई आंबेडकर, राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. शैलेश राणे यांनी प्रास्ताविकात संस्थेची वाटचाल स्पष्ट केली. कवयित्री सुनिता सुरवाडे यांनी आपल्या काव्यप्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले, तर मान्यवरांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. उल्हास पाटील यांनी काव्यसंग्रहातील निवडक ओळींचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजल भिरुड यांनी केले, तर पूनम राणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत