मुक्ताईनगरमध्ये परीक्षा केंद्रावर तोडफोड; कॉपी पुरवण्याच्या प्रयत्नप्रकरणी गुन्हा दाखल
मुक्ताईनगरमध्ये परीक्षा केंद्रावर तोडफोड; कॉपी पुरवण्याच्या प्रयत्नप्रकरणी गुन्हा दाखल
मुक्ताईनगर | लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-तालुक्यातील जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे सुरू असलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेदरम्यान अज्ञात इसमांनी शाळेच्या इमारतीची तोडफोड करत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
फिर्यादी मुख्याध्यापक प्रकाश रामकृष्ण बाउस्कर (वय ५८, रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना दुपारी सुमारे १२.३० वाजता अफसर खान नामक इसम अनधिकृतपणे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आला व काही काळ परिसरात थांबून निघून गेला. त्यानंतर सुमारे १ वाजता १० ते १५ इसमांनी इमारतीच्या मागील बाजूचा लोखंडी गेट तोडून तसेच सुमारे दहा खिडक्यांच्या लोखंडी जाळ्या फोडून शाळेच्या मालमत्तेचे नुकसान केले. या वेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांनी संबंधितांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ते घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२९, १८९, ३२४(४) व ६२ तसेच महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध कायदा १९८२ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राजेश चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला असून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळा परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत