नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती व सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र – डॉ. रवींद्र भोळे
नर्मदा परिक्रमा म्हणजे भक्ती, शक्ती व सहनशक्तीचे ऊर्जास्तोत्र – डॉ. रवींद्र भोळे
लेवाजगत nyujjपुणे, वडगाव शेरी : संयम, विश्वास आणि अहंकाराचा नाश करणे म्हणजेच नर्मदा परिक्रमा होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे (उरुळी कांचन) यांनी केले.
नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल तपस्वी श्री हरी प्रल्हाद बढे यांचा सत्कार समारंभ वीरशैव लिंगायत सेवा मंडळ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. भोळे म्हणाले की, ऋषी मार्कंडेय यांनी हजारो वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा केली. पायात चामड्याच्या वस्तू न वापरता, सात्विक आहार घेऊन व आत्मिक शक्ती जागृत ठेवत ही परिक्रमा केली जाते. नर्मदेच्या पवित्र उगमापासून प्रारंभ होऊन अमरकंटक किंवा ओंकारेश्वर येथे ही परिक्रमा पूर्ण होते.
तपस्वी श्री हरी प्रल्हाद बढे व डॉ. हरी निवृत्ती पाटील यांनी सुमारे ३६०० किलोमीटर अंतर १०५ दिवसांत पूर्ण करत एक प्रकारचे तपच केले आहे. जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या कालखंडातून वेळ काढून ही परिक्रमा पूर्ण करणे हे मोठे आध्यात्मिक सामर्थ्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेच्या १८ व्या अध्यायात यज्ञ, दान, तप व कर्म यांचे महत्त्व सांगितले आहे. मात्र कलियुगात या गोष्टींसाठी वेळ नसतो. परंतु सत्कर्मासाठी वेळ द्यावा लागतो, असे ते म्हणाले. वारकरी संप्रदायातील हरी प्रल्हाद बढे यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आत्मिक शांती, अंतरिक ऊर्जा व निष्काम सेवाभाव जोपासला असून त्यांच्या हस्ते अन्नदानही होत आहे.
मनुष्य नश्वर आहे. मोहमायेत अडकलेल्या जीवनात काही क्षण तरी अध्यात्मासाठी दिल्यास आत्मिक समाधान लाभते. मोक्षप्राप्ती व कर्मबंधनातून मुक्तीसाठी नर्मदा परिक्रमा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अण्णासाहेब पाटील, डॉ. हरी निवृत्ती पाटील, आदिशक्ती मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष अमोल पाटील, मुरलीधर खर्चे (सहसचिव, भ्रातृ मंडळ पुणे), तपस्वी श्री हरी प्रल्हाद बढे, नारायण प्रल्हाद बढे, सौ. मंदाकिनी नारायण बढे, अंकुर हरी बढे, सौ. ममता अंकुर बढे, सौ. सविता हरी बढे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सौ. सविता हरी बढे व श्री अंकुर हरी बढे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. अंकिता अ. नारखेडे व सौ. स्नेहल बारदोषकर यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील अनेक भाविक, वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत