नेब कॉलनीत किरकोळ वादातून तरुणाचा खून; भुसावळ शहर हादरले
नेब कॉलनीत किरकोळ वादातून तरुणाचा खून; भुसावळ शहर हादरले
लेवाजगत न्यूज | भुसावळ प्रतिनिधी-शहरातील नेब कॉलनी परिसरात रविवारी मध्यरात्री किरकोळ वादातून एका ४२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनी परिसरात रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२) यांचा एका व्यक्तीसोबत किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले. त्यावेळी संतापाच्या भरात संबंधित व्यक्तीने सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारल्याचे सांगितले जाते. या गंभीर मारहाणीत सावकारे हे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी डीवायएसपी केदार बारबोले, चे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, या घटनेमुळे नेब कॉलनी व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मयत सावकारे यांच्या कुटुंबीयांनी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत