‘रिसेंट ट्रेन्ड्स इन एफपीजीए डिझाईन व अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ विषयावरील पाच दिवसीय एफडीपीला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘रिसेंट ट्रेन्ड्स इन एफपीजीए डिझाईन व अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ विषयावरील पाच दिवसीय एफडीपीला उत्स्फूर्त प्रतिसाद
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था), संचलित गोदावरी फाउंडेशन येथे ‘रिसेंट ट्रेन्ड्स इन एफपीजीए डिझाईन व अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या विषयावर पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ संलग्न असून संस्थेच्या आयक्यूएसी, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल व एम्बेडेड हब यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक डॉ. हेमंत टी. इंगळे व सहसंयोजक डॉ. विजय डी. चौधरी यांनी कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
या एफडीपीमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक संस्था तसेच उद्योग क्षेत्रातील एकूण ६५ प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून किरण पाटील (व्हीएएसआय टेक्निकल लीड, Wipro, पुणे) तसेच डॉ. निधी पांडा (सिनियर एफपीजीए डिझाईन इंजिनिअर, एफपीजीए टेक सोल्युशन, पुणे) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. प्रस्तावना करताना डॉ. हेमंत टी. इंगळे यांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली रचनेत एफपीजीए तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्यविकास व नवोपक्रम यांवर भर दिला. की-नोट भाषणात डॉ. विजय डी. चौधरी यांनी व्हीएलएसआय व एफपीजीए आधारित प्रणाली विकासातील उदयोन्मुख प्रवाहांवर सखोल मार्गदर्शन केले.
सत्रांदरम्यान किरण पाटील यांनी एएसआयसी व एफपीजीए यांतील तांत्रिक-आर्थिक तुलना, ‘टाईम-टू-मार्केट’चे फायदे, व्हीवाडो टूलद्वारे वर्तणुकीय व पोस्ट-सिंथेसिस सिम्युलेशन, डीबगिंग तंत्रे तसेच सॉफ्ट-कोर (मायक्रोब्लेझ) व हार्ड-कोर (एआरएम कॉर्टेक्स) प्रोसेसरचे उपयोग स्पष्ट केले.
डॉ. निधी पांडा यांनी व्हीएलएसआय डिझाइनमधील फ्रंट-एंड (आरटीएल कोडिंग, सिम्युलेशन) व बॅक-एंड (प्लेस अँड रूट, टाइमिंग अॅनालिसिस) प्रक्रिया, एचडीएल रचना, मॉड्यूल लेखन, टेस्टबेंच तयार करणे, बेसिक सर्किट व्हेरिफिकेशन, बिटस्ट्रीम जनरेशनची संपूर्ण प्रक्रिया, संश्लेषण, अंमलबजावणी व वेळेच्या मर्यादा यांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. तसेच फ्लिप-फ्लॉप, काउंटर, एएलयू डिझाईन सिम्युलेशन, एसओसी व एमपीएसओसी आर्किटेक्चर, प्रोसेसिंग सिस्टम प्रोटोकॉल आणि उच्च-गती डेटा कम्युनिकेशन संकल्पना यांचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींनी मिनी-प्रोजेक्ट सादर करून त्याची अंमलबजावणी व चाचणी केली. अभिप्राय सत्रात या एफडीपीमुळे उद्योगाभिमुख कौशल्यविकासास मोठी चालना मिळाल्याचे सहभागी व आयोजकांनी नमूद केले.
उद्घाटन व समारोप सत्राचे सूत्रसंचालन प्रा. शिरीन पिंजारी यांनी केले. या यशस्वी कार्यशाळेबद्दल डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष), डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत