सावद्यात थरकाप! वीज खांबावर काम करताना तिघा कामगारांना जोरदार विजेचा धक्का; प्रकृती गंभीर
सावद्यात थरकाप! वीज खांबावर काम करताना तिघा कामगारांना जोरदार विजेचा धक्का; प्रकृती गंभीर
सावदा (ता. रावेर) लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :
सावदा शहरात बुधवारी दुपारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. शहरातील स्टेशन रोड परिसरातील १३२ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज वाहिनीच्या खांबावर देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असताना तिघा कामगारांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे तिघेही कामगार उंच खांबावरून खाली कोसळले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, महावितरण कंपनीच्या १३२ केव्ही उपकेंद्राअंतर्गत संबंधित वीज खांबावर दुपारी सुमारे ४:३० वाजेच्या सुमारास देखभाल काम सुरू होते. हे काम ठेकेदारी पद्धतीने करण्यात येत होते. यासाठी बिहार राज्यातील काही कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती.
कामगार खांबावर चढून तांत्रिक काम करत असताना अचानक वीज प्रवाहित झाल्याने त्यांचा विद्युत तारांशी संपर्क आला. क्षणार्धात त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला आणि ते खाली फेकले गेले. या दुर्घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना प्रथम सावदा येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे हलविण्यात आले आहे.
जखमी कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नसून ते सर्व बिहार राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची चौकशी सुरू असून कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजना पाळल्या गेल्या होत्या का, याबाबत प्रशासन तपास करत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सावदा शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत