Contact Banner

शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाची आरोग्य सेवा

 

shegaonatil-rashtrapati-dauryat-dr-gunvantrao-sarode-ayurved-mahavidyalayachi-arogya-seva



शेगावातील राष्ट्रपतींच्या दौऱ्यात डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाची आरोग्य सेवा

राष्ट्रीय आरोग्य मेळ्यात नागरिकांची तपासणी व मार्गदर्शन

जळगाव / शेगाव (प्रतिनिधी) – देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्यात जळगाव येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांनी सक्रिय सहभाग नोंदवित नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली.

संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे दि. २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय आरोग्य मेला–२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळा आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

या मेळ्यात आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी, सोवा-रिग्पा व होमिओपॅथी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची निःशुल्क आरोग्य तपासणी, समुपदेशन व औषधोपचार करण्यात येत आहेत. डॉ. सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांची तपासणी करून त्यांना जीवनशैलीत बदल, आहारविहार व पारंपरिक उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.

या मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आढावा बैठकीदरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन संस्थेच्या सहभागाबाबत माहिती दिली. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर उभारण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपतींनी औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांनी वनऔषधींची लागवड वाढवावी, पारंपरिक भारतीय औषधपद्धती व आधुनिक जीवनशैली यांचा संगम साधून आरोग्यदृष्ट्या सक्षम भारत घडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय आरोग्य मेला–२०२६ हा नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, आयुष सेवांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना औषधी शेतीबाबत मार्गदर्शन देण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. मेळा दि. २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.