अमळनेरात गावठी कट्ट्याचा ‘मिस फायर’; तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
अमळनेरात गावठी कट्ट्याचा ‘मिस फायर’; तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी | अमळनेर
शहरातील अमलेश्वर नगर परिसरात गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. गावठी कट्टा हाताळत असताना अचानक ‘मिस फायर’ होऊन एका तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला.
अरुण सुरेश महाजन (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव असून ते ‘कुबेर मंडप’ या नावाने व्यवसाय करत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरुण महाजन हे रात्री आपल्या घरी गावठी कट्टा हाताळत असताना नजरचुकीने ट्रिगर दाबला गेला. यामुळे सुटलेली गोळी थेट त्यांच्या शरीरात लागली.
गोळी लागताच त्यांना तातडीने डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अरुण महाजन यांच्या मातोश्री आशा सुरेश महाजन यांनी नुकतीच प्रभाग क्रमांक १८ मधून शिवसेना (शिंदे गट) कडून नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे ही घटना समजताच रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
मृतांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित गावठी कट्टा नेमका कुणाचा होता, तो अरुण महाजन यांच्याकडे कसा आला आणि नेमकी घटना कशी घडली, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत