Contact Banner

बालकांच्या हृदय तपासणीसाठी जळगावात मोफत शिबिर; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रियाही मोफत

 

balakancha-hriday-tapasnisathi-jalgaonat-mofat-shibir-dr-ulhas-patil-rugnalayat-shastrakriya-mofat

बालकांच्या हृदय तपासणीसाठी जळगावात मोफत शिबिर; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रियाही मोफत

लेवाजगत न्यूज | जळगाव-जन्मजात हृदयविकाराने त्रस्त असलेल्या बालकांसाठी जळगावातील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातर्फे २७ ते २९ मार्चदरम्यान विशेष मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून बालकांची सखोल तपासणी केली जाणार असून, गरज भासल्यास शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार आहे.

जन्मत:च हृदयाला छिद्र असणे किंवा इतर जन्मजात हृदयरोगांमुळे अनेक बालकांना लहान वयातच गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर योग्य वेळी निदान व उपचार मिळावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये बालकांच्या हृदयातील दोष, श्वास घेण्यास त्रास, वजन नीट न वाढणे, लवकर थकवा येणे यांसारख्या लक्षणांची बारकाईने तपासणी केली जाणार आहे.

या शिबिरात अत्याधुनिक तपासण्यांसह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बालकांची तपासणी करून पुढील उपचारांची दिशा ठरविणार आहे. तपासणीनंतर ज्या बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांच्यावर शासनाच्या विविध योजनांअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम करणार शस्त्रक्रिया
डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धवलकुमार खडके, अपोलो रूग्णालयाचे डॉ. भूषण चव्हाण, डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. झिशान व डॉ. मनमिता रेड्डी यांची तज्ज्ञ टीम शस्त्रक्रिया करणार आहे. विशेष म्हणजे या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.

दर आठवड्याला नियमित तपासणी सुविधा
या विशेष शिबिरानंतरही दर सोमवार व बुधवार रोजी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात बालकांच्या हृदय तपासणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळून बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेता येणार आहे.

ज्या पालकांना त्यांच्या बालकांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसत आहेत किंवा संशय आहे, त्यांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी ९४०३३३७४९४ व ७०३०५७११११ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.