बामणोद येथे दोन दुचाकींची भीषण धडक; विरोदा येथील युवराज कपले यांचा दुर्दैवी मृत्यू
बामणोद येथे दोन दुचाकींची भीषण धडक; विरोदा येथील युवराज कपले यांचा दुर्दैवी मृत्यू
लेवा जगत न्यूज, विरोदा प्रतिनिधी-फैजपूर–भुसावळ मार्गावर बामणोद येथे रईस हॉटेलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २ मार्च , सोमवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात विरोदा येथील श्रीराम ट्रेडिंगचे संचालक युवराज भगवान कपले (वय ४६) यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, युवराज कपले हे बामणोद येथे कर्णछेदनाचा कार्यक्रम आटोपून परतीच्या मार्गावर होते. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या लाल रंगाच्या एव्हेंजर दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कपले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील गोल्डन अवर रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती युवराज कपले यांना मृत घोषित केले.
अज्ञात दुचाकीचालक पसार; वाहन हलवण्याचा प्रयत्न उधळला
अपघातानंतर अज्ञात दुचाकीचालक घटनास्थळावरून पसार झाला. तसेच मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी उभी असलेली विना क्रमांकफलकाची लाल रंगाची एव्हेंजर दुचाकी अज्ञात व्यक्तीकडून हलवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली. भुसावळ येथून रुग्णालयातून परत येणाऱ्या गावकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला.
अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी पुढील तपासासाठी फैजपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.
होळीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कपले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे विरोदा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत