Contact Banner

कान्हदेशातील तीन युवा संतांना ‘शास्त्री’ पदवी; वडताल येथे सन्मान सोहळा उत्साहात

 

khandeshatil-tin-yuva-santanna-shastri-padvi-vadtal-yethe-sanman-sohala-utsahat


कान्हदेशातील तीन युवा संतांना ‘शास्त्री’ पदवी; वडताल येथे सन्मान सोहळा उत्साहात

लेवा जगत न्यूज प्रतिनिधी सावदा -  श्री स्वामीनारायण संप्रदाय मध्ये विद्वत्ता, निष्ठा आणि हरिभक्तीचा अनमोल वारसा जपणारे अनेक संत-महंत कार्यरत आहेत. कान्हदेश विभागात तपोनिधी अ. नि. प. पु. स. गु. शास्त्री स्वामी निलकंठदासजी यांच्या मंडळातही अशाच गुणसंपन्न संतांची परंपरा असून यावर्षी या मंडळात आणखी तीन तेजस्वी रत्नांची भर पडली आहे.

शास्त्री स्वामी श्रीजीप्रियदासजी, शास्त्री स्वामी धर्मप्रियदासजी आणि शास्त्री स्वामी हरिप्रियदासजी या तीन तरुण विद्यार्थी-साधकांनी गुजरात येथील सोमनाथ संस्कृत विद्यापीठ  मधून ‘शास्त्री’ (बी.ए.) पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. त्यांच्या या यशामुळे कान्हदेश विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या तिघा संतांना नुकताच वडताल येथे आयोजित विशेष समारंभात  वडताल धाम येथिल गादीपती राकेश प्रसादजी महाराज  यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. महाराजश्रींनी पदवीधर संतांचा सन्मान करून त्यांना पुढील आध्यात्मिक, शैक्षणिक व धर्मप्रसार कार्यासाठी आशीर्वाद दिले.

हे सर्व विद्यार्थी गुजरातमधील वडताल येथील श्री  लक्ष्मी नारायण देव कॉलेजचे सन्माननीय पदवीधर आहेत. या महाविद्यालयातून दरवर्षी अनेक संत उच्च शिक्षण घेऊन संप्रदायाच्या सेवेत कार्यरत होत आहेत.

कान्हदेश सत्संगाची माऊली गुरुवर्य प. पू. स. गु. शास्त्री स्वामी धर्मप्रसाददासजी तसेच संप्रदायाचे भूषण, विद्वान प. पू. स. गु. शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी (वेदांत व्याकरणाचार्य – गोल्ड मेडलिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण संतांमध्ये शास्त्राध्ययनाची प्रेरणा सतत वृद्धिंगत होत आहे.

संप्रदायात वाढत असलेली ही शैक्षणिक परंपरा भविष्यात धर्मप्रसार, संस्कारवर्धन आणि समाजप्रबोधनासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या तिन्ही युवा संतांनी प्राप्त केलेले यश हे केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण कान्हदेश विभागासाठी अभिमानास्पद आहे.

या सर्व संतांना पुढील वाटचालीसाठी सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दासजी,शास्त्री धर्म किशोर दासजी,पुजारी सत्यप्रकाश दासजी व लेवा जगत न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.